एखाद्या पावसाळी दुपारी
[caption width="165" align="alignright"] Saumitra[/caption]
एखाद्या पावसाळी दुपारी, मी तुला घेऊन एखाद्या क्राऊडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो,
तेंव्हा तुझं हात माझ्या हातांमध्येच असतो,
खाली मान घालून तू गर्दी मधून चालत असतेस, तशीच माझ्यासोबत एका टेबलाशी बसते,
सगळी गर्दी तुझ्याकडेच अनिनिश नेत्रांनी पाहत असते,
मी ही फक्त तुझ्याकडेच, फक्त तुझ्याकडेच पाहत असतो,
तुझ्याशीच बोलत असतो, तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, आपण दोघेच असतो,
अशासाठी कधीतरी एका पावसाळ्यात, एका दुपारी, सहज सोपं बोलत-बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत जेवायला तू येशील का ?
अशाच पावसात अर्धा भिजत, मी तुला सांभाळत-सांभाळत नेत असतो, एखाद्या अनोळखी शहराच्या रस्त्यावरून,
तू सावध चालत असतेस थोडी जवळ - थोडी दुरून,
आणि अचानक तू माझ्या हातातली छत्री घेतेस, मिटून टाकतेस, टाकूनच देतेस,
मग माझं हात हातात घेऊन, रस्त्यात साचलेल्या पाण्यातून तू पाणी उडवत चालू लागतेस,
कडेकडेने वळचणीला उभे असलेले लोक, माझा प्रचंड हेवा करत पाहत असतात,
आणि मी मात्र तू छत्री मिटलीस दूर टाकून दिलीस, अशा पावसात माझ्यासोबत चक्क चिंब भिजत चाललीस म्हणून रस्त्यात साचल्या डबक्यावरून एखाद्या सुफी संतासारखा न बुडता चालत जातो, हरखून तुझ्याकडेच पाहत राहतो,
अशासाठी कधीतरी पावसाळ्यात एका दुपारी माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जायला येशील का ?
अशाच पावसाळी एका संध्याकाळी, समुद्रकिनारी ढगांमागे कुठेतरी,
सूर्यबिंब भिजत चिंब बुडत असताना, समुद्राची गाज दोघांवरून पार होताना,
माझं झालं-गेलं उगाच मला आठवताना, गल्वरून माझे अश्रू पावसात मिसळून वाहताना,
तुझ्याकडे अशात पहाण्याच मी मुद्दाम टाळताना,
नकळत मी तुझा हात हातात घेतल्यावर, हळूच तू माझ्यकडे मान वळवून पाहिल्यावर,
माझ्या गालावरच पाऊस आणि अश्रू तुला वेगवेगळे निथळताना दिसल्यावर,
अश्रू पुसायला तू माझ्या गालांशी हात न्यावा, आणि तुझ्या बोटांत फक्त पाऊसच येत रहावा,
आणि तू खळखळून हसत माझ्या हि नकळत माझ्या मिठीत शिरावी,
आपण दोघे घट्ट बिलगत गाजेमधून विरत विरत किनाऱ्यावर फक्त हुरहूर उरावी,
अशासाठी पावासाळी कुठल्या तरी संध्याकाळी उधान भरती आल्यावर हुरहूर होऊन समुद्रावर जायला येशील का ?
दाट काळोख होशील का ?
तुझा चेहरा माझ्या सोबत काळोखाला देशील का ?
सकाळी थोडा पाऊस उघडतो आपल्या खोलिचं दार उघडून आपण दोघे बाहेर पडतो
तुझा चेहेरा फुल्लेला माझा चेहेरा अजूनही तुझ्यामधेच भुल्लेला
तू भिजलं फूल दिसतेस पावसात उठली हूल दिसतेस
कुठेही घेऊन चल असं कडेवरलं मूल दिसते
वेटर सगळे आपल्याकडेच पाहात करतात गिल्ला
कुणीतरी खवचट ओरडतो ' कौए के हाँथ रसगुल्ला '
तू तात्काळ तशीच थांबतेस झट्कन् मागे वळून बघतेस
माझा हात घट्ट धरून पुन्हा तडक रूम गाठतेस
बाहेर पाऊस मुसळधार आता वाढत असतो
तितक्यात हळूच एक कावळा खिडकित येऊन बसतो
पंख चिंब भिजलेले डोळे मिट्ट मिटलेले
कावळ्याकडे पाहून तू माझ्याकडे बघतेस
पावसात चिंब भिजलेली एक चिमणी दिसतेस
अशासाठी कधीतरी
दुसऱ्या दिवशी सकाळी चिमणी होऊन जिव्हाळी समजून घ्यायला येशिल का ?
कुठल्यातरी एका पावसाळी दुपारी सहज सोपं बोलत बोलत तुडुंब गर्दीत माझ्या सोबत
अनोळखी शहरात भिजत चिंब दुस-या प्रहरात
चालत जायला येशील का ?
- सौमित्र
आभार - Kishore Kadam (सौमित्र)
1 अभिप्राय
मी स्वतः कविता लिहित नाही. पण मला कविता वाचायला आवडतात
ReplyDelete