मराठी कविता संग्रह

लगबग लगबग

19:58 सुजित बालवडकर 0 Comments Category :

लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने...
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने...
जरा पाणीया डोळ्याने अन्...जरा हासऱ्या चेहऱ्याने....!
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने...

चेहऱ्यावरती क्षमस्व घेऊन दारी उभा मी थकलेला....
आणि तुझा चेहरा जणू की चंद्र घनातुन लपलेला.....
सोळा साऱ्या कळा जागतील...सोळा साऱ्या कळा जागतील....अवघ्या एका खोडीने......
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने..

किणण हलावा लोलक हलके...नेत्रांमधला ओझरता...
पुन्हा राहशील दूर उभी तू पूर आतला ओसरता....
वेड लावुनी रुसशील म्हणशील......"वाट पाहिली वेडीने..."
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने....

संदर्भांचे अर्धे गाणे आता व्हायचे घे पुरते...
ना रहायचे पुन्हा निमंत्रण गाव व्हायचे गजबजते...
सांधायाचा पुनःश्च सेतू...जोडीने तडजोडीने.....
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने....

ऊन सावली मिठीत येईल...दिठित येईल जाग नवी..
जागी होईल तुझ्यात कविता...आणिक माझ्यातील कवी.....
गोष्ट सुरु ही रुष्ट परंतु.....संपायची गोडीने.....
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने....

लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने....
जरा पाणीया डोळ्याने अन्...जरा हासऱ्या चेहऱ्याने

-संदीप खरे

RELATED POSTS

0 अभिप्राय