मराठी कविता संग्रह

वेलकम न्यू मिलेनियम

16:44 सुजित बालवडकर 0 Comments Category :

वेलकम! न्यू मिलेनियम वेलकम !

संपल्या दोन सहस्त्रकांचेही

आम्ही असेच केले होते स्वागत

की संपेल त्यांचे सोबत

आमचेही एखादे तरी दु:ख म्हणुन

केवळ सहस्त्रके संपली

डोन्ट वरी!

अजुनही फास घेण्यापुरते का होईना

एखादे तरी

झुडुप शिल्लक आहे प्रत्येक शेतात

हेही विहंगम दृश्य

उगवतीच्या सोनेरी किरणांत

पाहायला मिळेल तुलाही

सहस्त्राका!

अजून तरी 'आता काय खावे?'

हा आमचा वारसा हक्काने मिळालेला प्रश्न

सुटला नसला तरी

"आता कुणाला खावे?"

हा प्रश्न कधीच पडू शकणार नाही

येथील आसनस्थ स्वापदांना

निदान तुझ्या आख्ख्या हजार वर्षात तरी

सहस्त्रका!

नसबंदी गरीबाची होते; गरीबीची नव्हे!

तेव्हा मित्रा सहस्त्रका,

ते पहा, तिकडे फिरताहेत स्प्रिंकलर

शॅम्पेन आणि व्हॅट सिक्स्टी नाईनचे

पूर ओसंडताहेत ब्लॅक लेबलवर

व्हाईट वाईनचे .

किमान कपड्यांचा कमाल निर्देशांक

ओलांडुन शरीरभर नाचताहेत

हाय फाय लेडीज अ‍ॅण्ड जंटलमन

तू तिकडेच टाक तुझी पहिली नजर

शक्यतो रममाण हो त्यांच्यात

इकडे काय पहतोस वेंधळ्यासारखा

अरे!

वामनांचा पाय कुठे निघालाय अजुन

माझ्या मस्तकावरुन ?

असेल हिंमत तर

उचल तो पाय आणि मग बघ

तूच ठरशील पहिले सहस्त्रक

विश्वाला गतीमान करणारे

चल ये तर मग

हा घे आसूड माझ्याजवळचा

आणि ओढ

वामनाच्या तिसरा पावलावर एकदम

वेलकम फस्ट मिलेनियम

वेल कम !


- नारायण सुमंत

सकाळः दिवाळी अंक २२.१०.२०००

RELATED POSTS

0 अभिप्राय