दंगलीच्या कविता
अखेरीला
माणसांनीच पेटवले
माणसांचे गाव
ही कविता
कुणासाठी?
माणसांनी
दार बंद करून
प्रेतं पहायचं सपशेल नाकारलं
शांतताप्रेमी नागरिक म्हणून
आपण त्यांची नोंद करायची का?
दंगलीत
गावच्या गावं उजाड झाली
कुणाची माणसं
कुणाची घरं लुटली
ज्यांना कुठलीच झळ नाही पोहोचली
अशाबद्दल वृतांतात
कुठलीच नोंद नाही
ह्याचा अर्थ असा नाही की
त्यांचं काहीच नाही लुटलं
काहीच नाही दुभंगलं
जमाव हजारो
लाखोंच्या संख्येत जमून
करीत आहे चर्चा
धर्माची
धर्म जो त्यांच्यासाठी झालाय
प्रश्न जीवन मरणाचा
हाती चुड घेउन
बेभान झालेला जमाव
आरोळी ठोकत
निघाला आहे धर्मरक्षणासाठी
ज्यांचा विस्तव मोठा
त्यांचा धर्म मोठा
आग पसरत चाललीये
शहरभर
वणव्यात झाडं होरपळून
कोळसा झाल्यानंतर
ज्या पाखरांनी गावात आसरा
घेतला होता
ती झाली आहेत बेघर
धुरांचे लोट नाकातोंडात
गेल्याने
गुदमरुन गेली आहे पॄथ्वी
आभाळभर
हे राम!
- सायमन मार्टीन
सकाळः दिवाळी अंक १९.१०.२००३
1 अभिप्राय
khup chhan ahe ani its true.......
ReplyDelete