मराठी कविता संग्रह

स्वतःची ओळख स्वतःलाच पटत नाही तेव्हा…

13:54 Sujit Balwadkar 1 Comments Category :

स्वतःची ओळख स्वतःलाच पटत नाही तेव्हा…
मी विचारतो आरशातल्या प्रतिबिंबालाच माझा परिचय.

आरसाही म्हणतो कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय खरं..अनेक वर्षांपूर्वी.
पण आता कसलातरी थर चढल्यासारखा वाटतोय चेहर्‍यावर…

मी खरवडून काढू पाहतो पुन्हा पुन्हा चेहर्‍यावरचा संधीसाधूपणाचा मुखवटा, स्वार्थाची पुटं,
आणि उगाचच होतो रक्तबंबाळ..!

मग आरसा हसून म्हणतो,
“तू स्वतःलाच बघत आलास माझ्यात वर्षानुवर्ष, बुडून राहिलास आपल्याच कैफ़ात..

आता चेहरा खरवडणं जमत नसेल तर निदान माझ्या अंगावरचा वर्ख तरी खरवडून टाक.

मग मीही होईन पारदर्शी,
माझ्यातून आरपार जग दिसेल तुला,

आणि त्या जगातल्याच कुणाच्यातरी डोळ्यात तुला दिसेल तुझा खराखुरा चेहरा..!”

– अभिजीत दाते

RELATED POSTS

1 अभिप्राय