मराठी कविता संग्रह

पाचुच्या रानात

04:17 Sujit Balwadkar 0 Comments Category :

पाचुच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा

पिवळी पिवळी
बिट्ट्याची काचोळी
नेसल्या डोंगर वाटा
माळून गजरे
फेसाचे साजिरे
सजल्या सागर लाटा
इथल्या रानात तसाच मनांत झरतो मायेचा झरा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा

गंधीत धुंदीत
सायली चमेली
लाजरी लाजेची पोर
पळस पांगारा
पिंपळ पसारा
जीवाला लावतो घोर
घंटेचा निनाद घालुनिया साद सांगतो जा पोरी घरा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा

आंब्याला मोहर
बकुळी बहर
कहर चाफा फुले
माडाच्या सांदीला
झाडाच्या फांदीला
ईवला खोपा झुले
बोलतो कोकिळ त्याच्या ग मंजूळ तोंडाला नाही थारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा

-गुरु ठाकूर

RELATED POSTS

0 अभिप्राय