आज नयनी पुन्हा जागली आसवे
भंगली शांतता वाजली आसवे
लोक जातात नयनांवरी कोरड्या
हाय दिसती कुठे आतली आसवे
तू जरी धाडले शुद्ध हासू मला
पोचता पोचता जाहली आसवे
आठवांच्या तुझ्या या वरातीमधे
वेदना प्राशुनी नाचली आसवे
जाहलो मी अता आसवांची कबर
मी मला खोडुनी गाडली आसवे
ही गझलही नसे ही नसे गीतही
फक्त मी तुजपुढे ढाळली आसवे
0 अभिप्राय