वर्ज्य
तुझ्या माझ्या लिलावाला जमा झालेत बाजारू
स्वतःला सांग आयुष्या किती पैशात आकारू
अरे निस्तेज थोडा कालच्या ग्रहणात झालो मी
मला हे काजवेही आज बघताहेत ललकारू
तिने अव्हेरले त्याचा अचंबा वाटला नाही
अताशा सावलीही लागली होतीच नाकारू
न आली झिंग तितकीशी कुण्या मद्यातुनी मजला
पुन्हा चल काळजाच्या त्या जुन्या जखमाच गोंजारू
कधी जुळणार आहे या जगाशी सूर आयुष्या
कितीदा मैफिलीभर ‘वर्ज्य’ मी होऊन झंकारू
नका ठेवायला सांगू मला ही लेखणी खाली,
पुन्हा ढळतील क्षितिजे अन पुन्हा लागेल अंधारू
– अभिजीत दाते
0 अभिप्राय