पाऊस
पाऊस नसतोच कधी खरा पाऊस
ते असतं फक्त आपलं म्हणणं
नाही तर
त्याला तरी कुठे मान्य आहे
असं जीव तोडून बरसणं
आज वळव्याचा पाऊस आला
आणि धरणीशी वाङ्निश्चय
करून गेला.
हिरव्या वस्त्रात तू सजणार
रान फुलांचा गजरा तू माळणार
इंद्र धनूचा मुकुट चढवणार
लता वेलीचे बाशिंग बांधणार
अशी शृंगाराची चाहूल देऊन गेला.
कोकीळ स्वरांची मैफिल रंगणार
मयूर भान हरवून नाचणार
काजव्यांची रोषणाई झगमगणार
विजेची आतषबाजी होणार
अशी विवाह सोहळ्याच्या ओल्या
स्वप्नांची कुजबुज करून गेला
नद्या तलाव ओसंडून वाहणार
तहानलेल्या विहिरी तृप्त होणार
उन्हाळलेली शेत पिकात डुबणार
पशू, पक्षी सारेच सुखावणार
अशी सुखी संसाराची
स्वप्ने रंगवून गेला.
0 अभिप्राय