मराठी कविता संग्रह

वेडात मराठे वीर दौडले सात....

20:53 सुजित बालवडकर 0 Comments Category :

(आपले सेनापति प्रतापराव गुजर याचा एका लढाईत पराभव झालेला असल्याचे महाराजांना समजले आणि रागाच्या भरात त्यांनी प्रतापराव गुजरास पत्र पाठवले.कवितेची सुरुवात शिवाजी महाराजांनी लिहीलेल्या पत्रापासुन झाली आहे. ते पत्र वाचताच प्रताप्राव गुजर यांनी रागाने आपल्या सात साथीदारांसह अब्दुल करीम बहलोल खान याच्या प्रचंड सैन्यावर हल्ला केला. यात ते सातही वीर शहीद झाले. )

("खरा इतिहास थोडा वेगळा आहे. इछुकांनी माहिती स्वतंत्रपणे घ्यावी")

"श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता ,
रण सोडुन सेनासागर आमुचे पळता,
अबलाहि घरोघर खर्या लाजतिल आता,
भर दिवसा आम्हां दिसू लागली रात "
वेडात मराठे वीर दौडले सात....

ते कठोर अक्शर एक एक त्यातील,
जाळीत चालले कणखर ताठर दील,
"माघारी वळणे नाही मराठी शील,
विसरला महाशय काय लावीत जात?"
वेडात मराठे वीर दौडले सात....

वर भिवई चढली दात दाबती ओठ,
छातीवर तुटली पटबंधाची गाठ,
डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ,
म्यानातुन उसळे तलवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात....

"जरि काल दाविलि प्रभु गनिमांना पाठ,
जरि काल विसरलो जरा मराठी जात,
हा असा धावतो आज अरि-शिबिरात,
तव मानकरी हा घेवुन शीर करात"
वेडात मराठे वीर दौडले सात....

ते फ़िरता बाजुस डोळे, किंचित ओले,
सरदार सहा सरसावुन उठले शेले,
रिकिबीत टाकले पाय झेलले भाले,
उसळले धुळीचे मेघ सात निमिशात
वेडात मराठे वीर दौडले सात....

आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना,
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना,
छवणीत शिरले थेट भेट गनिमांना,
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात....

खालून आग, वर आग आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रूर ईमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी,
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात....

दगडावर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा,
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा,
क्षितिजावर उठतो अजुन मेघ मातीचा,
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात....

- कुसुमाग्रज

RELATED POSTS

0 अभिप्राय