मराठी कविता संग्रह

** वळून पाहणार नाही.. **

18:13 Sujit Balwadkar 0 Comments Category :

हिरव्या डोंगरमाथ्यावर
रानफुलं वेचत
नाचत होते..

अन अचानक, अडकला पदर..

वळून पाहिले तर
काटेरी झुडूप..

कुठून अवचित तू आलास नि
धागा अन धागा जपत
हलकेच सोडवलास..

अन मी मात्र गुंतले तुझ्यात..

मग गुलाबी डोंगरमाथ्यावर
रानफुलं उधळत
धावत राहिले..

मग , अडकला पदर..

वळून पाहिले तर
तू..

मी न बोलताही उत्तर दिलेला
प्रश्न
डोळ्यांत घेऊन निरुत्तर उभा..

तू पदर अलवार सोडूनही दिलास..

सोडलास..

मग उजाड डोंगरमाथ्यावर
सुकलेली रानफुलं घेऊन
चालत राहिले..

आज परत ,पदर अडकलाय..

काट्यांत की तुझ्या हातात ?

वळून पाहणार नाही..
अशीच राहीन उभी..

भ्रम जपत..

तुटे पर्यंत..

- स्वप्ना

RELATED POSTS

0 अभिप्राय