मराठी कविता संग्रह

प्रेम कर भिल्लासारखं

01:17 सुजित बालवडकर 1 Comments Category :

पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इन्द्रधनु बांधील काय?
उन्हाळ्यात्ल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत
जास्तित-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुध्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकुनकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं...

- कुसुमाग्रज

RELATED POSTS

1 अभिप्राय

  1. khup divasane hi kavita punha wachali, thanks sujeet

    ReplyDelete