नंतर पाहू
माणसातले अंतर पाहू
ब्रम्हांडाचे नंतर पाहू...
क्षितिज पापण्यांचे ओलांडुन
या डोळ्यात दिगंतर पाहू...
रुमाल म्हणतो रडून घे तू
हसण्याचे स्थित्यंतर पाहू...
क्षण मरणाचा अर्क युगाचा
जन्माचे मध्यंतर पाहू...
माझ्यावाचुन तुला वेदने
मिळते का गत्यंतर पाहू...
गरिबासाठी लुटून मंदिर
भक्तीचे प्रत्यंतर पाहू...
तुझ्या मिठीने काळ थांबतो
आहे काय निरंतर पाहू...
- विजय आव्हाढ
0 अभिप्राय