मराठी कविता संग्रह

रजिस्ट्ररड कविता

15:53 सुजित बालवडकर 0 Comments Category :



कविता करणार नाही आता ?
का ?
चोरतात म्हणून?
रजिस्ट्रेशन केल्याशिवाय नाहीच ?

अस्स का?
बर मग कसं करशील?
म्हणजे नक्की कश्या कश्याच करशील?

स्वरांचं ?
व्यंजनांच?
की शब्दांच ?
तुला समजलेल्या देवाचं?
की तू मांडलेल्या प्रेमाचं ?
काळजावरच्या हल्ल्याचं?
की गदगदून दिलेल्या सल्ल्याच?

म्हणजे नक्की कश्या कश्याच करशील?

तू बघितलेल्या निसर्गाचं करशील?
की अर्जात तुझ्यावर झालेले अन्याय भरशील ?
घेशील का तुझी प्रेयसी, तुझी बायको, तुझे आई बाबा?
घेशील का तुझी शाळा, तुझेच बालपण, तुझा डबा?
काय करशील तुझ्या दुखांच, तुझ्या आनंदाचं, तुझ्या माणसाचं?
काय करशील कालपर्यंत दिलेल्या -घेतलेल्या भिकेच्या तपशिलाच?

म्हणजे नक्की कश्या कश्याच करशील?

करशील?
करशील तर मग
मग तू पाहिलेला बॉम्बस्फोट ही कर
तू पाहिलेला बलात्कार पण घे
सोसलेल्या सर्व अपमानांचे बाजार घे,
रोजच्या अश्रुंचे कामगार घे
देशाच्या पाठीवर झालेले सगळे सगळे वार घे
मागच्या दुष्काळातला नवसाचा पावसाळी सोमवार घे
आणि हो
फक्त सगळ्या प्रती चार घे
सगळ्या प्रती चार घे

काही सांगायचंय का तुला?
काय म्हणतोस ?
बांधणी तुझी आहे…?
त्याच्यामुळे 'ती' कविता झालीये..?

अच्छा !!
हम्म….

कर कर
अरे मग कविता म्हणजे नुसती बांधणी ?
कर कर
रजिस्ट्रेशन कर

फक्त एकच शंका आहे
रजिस्ट्रेशन केल्याशिवाय
किंवा करूनही
कोणी तुझी 'कविता' चोरली
तर तुला कुठल्या गोष्टीचे दु:ख वाटेल ?

तुझ्या 'बांधणीचे'?
की अजून काही ?


- तनवीर सिद्दीकी

RELATED POSTS

0 अभिप्राय