मराठी कविता संग्रह

स्टेट

04:09 सुजित बालवडकर 0 Comments Category :


शासकांनी
खोबरेल तेलाचे न्याय्य वाटप व्हावे म्हणून
सेक्टर सेक्टरमध्ये केंद्रे काढली
दर दिवशी प्रत्येकाने आपले डोके पुढे करायचे
आणि टाळूवर तेल चोपडून घ्यायचे
प्रतिभावंताने

आपले डोके असे खोबरेल तेलासाठी वाकवायचे
म्हणून ठाम नकार दिला,
खंबीर भूमिका घेतली:
खोबरेल तेल ही स्वायत्त वस्तू असून
कलावंताला त्याच्या इच्छेप्रमाणे
कोणापुढेही न वाकता
डोक्यास तेल चोपडण्याचा
जन्मसिद्ध अधिकार आहे!
शासनही खंबीर होते, ठाम होते
त्याच्या दृष्टीने सामान्यांच्या हितासाठी
काही कटू निर्णय घ्यावेच लागतात
शेवटी प्रतिभावंताने देश सोडला,
सोडचिट्ठी दिली,
परकी नागरिकत्व स्वीकारले,
तेथे त्याने सुरुवातीला छळाच्या कहाण्या सांगितल्या

पापड मोडला म्हणून फाशी
भर रस्त्यात चिथावले म्हणून फाशी
कवितेचा कट केला म्हणून फाशी
आणखीन काय काय बांधवांच्या कणवेपोटी!
शेवटी त्यालाही लोक कंटाळले,
बेचव कहाण्यांना
त्यांना छळाच्या ताज्या कहाण्या हव्या होत्या
आणि तेही कंटाळला
स्वातंत्र्याला
मुक्ततेला
अनिर्बंधतेला
मातीला आपल्या हाडांची ओढ अटळ असते
हे त्यालाही आतून नाकारता आले नाही

आता त्याच्यापुढे
गहन प्रश्न उभा राहिला
धोतर नेसले तर हवेत उडते,
सैरभैर होते
घट्ट वस्त्र घातले
तर घुसमटते, जीव गुदमरतो

- वाटेवरच्या कविता, अशोक नायगावकर


Image courtesy: Ashok Naigaonkar


अशोक नायगांवकर यांच्या इतर कविता -


  1. एकदा पहिल्या पन्नासातच पन्नास हजार विद्यार्थी आले

  2. सुलभ शौचालय

  3. पुणे

  4. पुन्हा लागो नये भुक

RELATED POSTS

0 अभिप्राय