मराठी कविता संग्रह

बघ एकदा

14:22 Sujit Balwadkar 4 Comments Category :

सूर्य बनून तरी बघ एकदा अंधाराला जाळून तरी बघ एकदा

तुझ्यातला तू नक्की भेटेल तुला स्वत:च्या सावलीला विसरून तरी बघ एकदा

विद्रोहाची एक ठिणगीही पुरेल आता पण त्या धगीवर अनवाणी चालून तरी बघ एकदा

लपलाय तुझ्यातही एक सुरवंट गुरफटलेल्या कोशातून बाहेर पडून तरी बघ एकदा,

अशी मुक्तता अशी प्रसिद्धी नव्हती मागितली मी तुमच्यापाशी

नव्या नव्या आव्हानांना सामोर जावून क्षितीज गाढण्याची पात्रता होती माझ्यापाशी

ट्वेंटी फोर बाय सेवनच्या चक्रात माझी कहाणी उध्याचा इतिहासच आहे तुमच्यासाठी

पण सॉरी सीस सारखे नुसतेच पोकळ शब्द नकोत आता माझ्यासाठी,

मी भोगलेल्या त्या यातना त्या वेदना समजून तरी बघ एकदा

समाज, राजकारण सोडून तुझ्यातला माणूस आजमावून तरी बघ एकदा

माझ्यासारख्या असंख्य बहिणींचा कैवारी होवून तरी बघ एकदा

नऊ महिने रक्ताचं पाणी करून वाढवणाऱ्या आईतली नारी जाणून तरी बघ एकदा,

कधीच न भेटलेल्या बहिणीला समाज-जागृतीची ओवाळणी देवून तरी बघ एकदा

तुझ्या काळजात पेटणारी ही ठिणगी समाजापर्यंत पोचवून तरी बघ एकदा

या महासागरातला खारीचा वाटा ही सही पण तो उचलून तरी बघ एकदा

कधीच न भेटणाऱ्या या बहिणीला एवढी श्रद्धांजली वाहून तरी बघ एकदा.

.................................................................................................
अंजली राणे वाडे : ३०/१२/१२. | anjaliranewade@gmail.com
.................................................................................................

RELATED POSTS

4 अभिप्राय