तुकोबा
फक्त तुझ्या नामघोषाचे प्रवाह शब्दांकडे वळवून
कवितेचं बारमाही भरघोस पीक घेण्याचा आमचा इरादा,
आमच्या शब्दांचं अवकाश भरण्यासाठी
तुझ्या नावाचा वापर कवितेमधून
एक खाजगी विचारू तुकोबा,
सगळ्याच विद्यापीठांतून
तुझे अभंग अभ्यासक्रमाला असतात
यासाठी तू काही विशेष प्रयत्न करतोस का?
नाही, कवी म्हणून हे सर्व माहीत असायला हवं बाबा
नाकातोंडात पाणी जाईपर्यंत
पंडितांनी तुझ्या शब्दांना इंद्रायणीत बुडवलं,
तुझी कविता म्हणजे कातडीसारखी जगण्याला चिकटलेली,
आम्ही तयार करतो वाफे
त्यात काही तुझ्यासारखं पेरावं म्हणून
पण महापुरात आमचे शब्द
मातीला घट्ट धरू नाही शकत,
जगण्याचा अंत:प्रवाह
कवितेकडे वळवता आला पहिजे,
आमची श्वासाची लय कवितेत उतरत नाही
नुसतेच भजनातल्या मृदंगासारखे वाजत राहतो,
आता आम्हाला कळायला हवं
नुसतं तुझं नाव घेऊन कविता मोठी होत नसते
त्याकरिता
जगण्याशी सम साधायला
शिकलं पाहिजे.
- "तूर्तास", दासू वैद्य
Image courtesy: Rupesh Jadhav
2 अभिप्राय
अप्रतिम..........
ReplyDeleteअप्रतिम अगदी निशब्द... जगण्याशी सम साधायला शिकलं पाहिजे.. मस्तच
ReplyDelete