ओसाड माझे घर…
(कै. सुरेश भट यांच्या जयंतीदिनानिमित्त ‘मराठी कविता’ या ऑर्कुट कम्युनिटीवर आयोजित गझल मुशायर्यात भटांच्या “ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे” या ओळीवर लिहिलेली ही तरही गझल)
ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
मारेकरी भिंती इथे छप्पर कसायासारखे
गर्दीत वाटे एकटे, एकांतही छळ मांडतो,
अन् चालले झगड्यात या आयुष्य वाया सारखे
डोळ्यात या काहीतरी नक्की असे संजीवनी
तू पाहिले की वाटते फिरुनी जगायासारखे
तेव्हा तुझ्या वचनावरी मी भाळलो होतो जरी
होते बहाणेही तुझे, ह्रुदयी जपायासारखे
मी जाणतो सरले अता नाते तुझ्या माझ्यातले
पण स्वप्न माझे मारते मजला बढाया सारखे
– अभिजीत दाते
0 अभिप्राय