मराठी कविता संग्रह

कधी कधी चुकते जगण्याची अटकळ आयुष्या..!

18:37 Sujit Balwadkar 0 Comments Category : ,

कधी कधी चुकते जगण्याची अटकळ आयुष्या.
काट्यांतुनही फ़ुलून येते हिरवळ आयुष्या.

उगाच छत्तिसचे नाते तू धरले वार्‍याशी.
तुला कुठे लाभला स्वतःचा दरवळ आयुष्या.

नदी, झरे अन सागर सारे प्राशुनिया झाले.
तहान आता भागवेल का मृगजळ आयुष्या?

प्रवास अपुला तसा चुकीच्या दिशेनेच होता,
किनार्‍यास बघ नेते आहे वादळ आयुष्या.

झुळझुळ वाहिल माझे मीपण निर्झराप्रमाणे
फोड जरासा अस्तित्वाचा कातळ आयुष्या.

तुला काळजी त्या अंधार्‍या जुन्या कोपर्‍यांची.
जपली मी सामानासोबत अडगळ आयुष्या.

मांडलीस तू गणिते आल्या गेल्या श्वासांची.
क्षणही असतो शतकापेक्षा पुष्कळ आयुष्या.

नसे तोडगा गर्दीवरती, एकटेपणा हा.
एकांतीही आठवणींची वर्दळ आयुष्या.

तुझ्यात वसतो शंभो, तुझिया आत अगस्तीही
बघ तर घेउन हलाहलाची ओंजळ आयुष्या.

कसा मिळावा तुला आसरा तिच्या लोचनांचा.
तिच्या आसवाइतका का तू निर्मळ आयुष्या ?

– अभिजीत दाते

RELATED POSTS

0 अभिप्राय