आम्ही!
जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही
फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही
तुरुंगातील स्वप्नांची अम्ही धुंडाळितो स्वप्ने
वधस्तंभासवे दाही दिशांना हिंडतो आम्ही
कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही
जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…
- एल्गार, सुरेश भट
0 अभिप्राय