मराठी कविता संग्रह

एल्गार

01:45 सुजित बालवडकर 2 Comments Category : ,

अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही

येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही

हे दु:ख राजवर्खी .. ते दु:ख मोरपंखी..
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही

त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
( गावात सज्जनांच्या आता तणाव नाही )

झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही

गर्दित गारद्यान्च्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मढ्याला आता उपाव नाही

जावे कुण्या ठिकाणी उद्वस्त पापियांनी?
( संतांतही घराच्या राखेस भाव नाही )

उचारणार नाही कोणीच शापवाणी...
तैसा ऋषीमुनींचा लेखी ठराव नाही

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे...
हा थोर गाडुंळाचा भोंदू जमाव नाही !

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

- एल्गार, सुरेश भट

RELATED POSTS

2 अभिप्राय

  1. चैतन्य05/10/2012, 04:07

    अप्रतिम

    ReplyDelete
  2. Manish Ramteke08/02/2013, 02:22

    साध्याच माणसांचा एल्गार येत आहे…
    हा थोर गाडुंळाचा भोंदू जमाव नाही ! jabab nahi sir, Suresh bhat sir tumchya samor natmastak ahe.

    ReplyDelete