मराठी कविता संग्रह

आता वाटतं

01:37 Sujit Balwadkar 1 Comments Category : ,

आता वाटतं की नऊ नऊ महिने घेणार एक एक शब्द यायला
आता वाटतं भरभरून द्यावसं वाटावं, असं नाहीच काही द्यायला
एका भाबड्या प्रामाणिकपणे सारंच मांडत आलो इतके दिवस
आता वाटतं - नको होतं सारं इतक्या लग्बगीने सांगायला
आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ,
कसे सचैल भिजायचो इतके दिवस - मजा वाटते आहे !
काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा
अस्वस्थ वाटते आहे, लेखणीची भीती वाटते आहे ...
आता वाटते इतका अधाशीपणा नको होता करायला
थोड्या धीराने घेतलं असतं, तर उरलीही असती श्रीशिल्लक काही
आता परत काही नवे वाटून घेण्यासाठी नवा प्रवास
प्राणात खोल शोधतोय त्राण; गवसत नाही !
भरून आला होतात काठोकाठ त्या मेघांनो - क्षमा !
बहरून आला होतात त्या उद्यानांनो - क्षमा !
झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात, फूल खुडण्यात
पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे !
पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो
यावर आता विश्वास ठेवायचा फक्त ...
हाताची घडी घालून, शांतपणे मिटायचे डोळे
थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं,
आणि उसळलंच तर म्हणायचं रक्त !

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

RELATED POSTS

1 अभिप्राय