मराठी कविता संग्रह

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले?

01:38 सुजित बालवडकर 0 Comments Category :

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?

ह्रदयात विझला चंद्रमा .. नयनी न उरल्या तारका ..
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले

अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा?
अजुनी मला फसवायला हे कुठले निमंत्रण राहिले ?

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ...
मी मात्र थांबुन पाहतो मागे कितीजण राहिले ?

कवटाळुनी बसले मज दाही दिशांचे हुंदके
माझे अता दु : खासवे काही न भांडण राहिले !

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले!

अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली
रे बोल आकाशा, तुझे आता किती पण राहिले?

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे अध्याप तोरण राहिले !

- सुरेश भट

RELATED POSTS

0 अभिप्राय