मराठी कविता संग्रह

मालवून टाक दीप...

18:16 सुजित बालवडकर 0 Comments Category :

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग...

त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भंग...

दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रुपरंग...

गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग...

ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग...

काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग....

- सुरेश भट

RELATED POSTS

0 अभिप्राय