मराठी कविता संग्रह

रोपटे

18:04 सुजित बालवडकर 0 Comments Category :

काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो!
मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो!

चारचौघांसारखे मज बोलणे जमलेच नाही,
सांग तू आता शहाण्या, काय मी बरळून गेलो?

मी अता घेणार नाही माप श्वासांच्या गजांचे...
जन्मठेपेतून माझ्या आज मी निसटून गेलो!

का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो?
मी तुम्हासाठीच तेव्हा कोरडा बहरून गेलो!

आज कैशी आपुली ही भेट ताटातूट झाली?
भेटतांना ऐन वेळी मी कुठे हरवून गेलो?

मी चुका केल्या तरीही काय हे नाही परेसे?
मी करोडो माणसांची अंतरे उजळून गेलो!

जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला-
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो!

- सप्तरंग, सुरेश भट

RELATED POSTS

0 अभिप्राय