मराठी कविता संग्रह

येरझारा

03:01 सुजित बालवडकर 0 Comments Category :

माझ्या छोट्याशा पर्णकुटिकेची
दारं लोटून घेऊन
दोन क्षण डोळे मिटून बसते ,
तेव्हा विसरलेलीच असते मी ----
की माझ्या द्वाराला मिळणार्‍या
असंख्य नागमोडी वाटांच्या टोकाला
एकेक सुबक महाल आहे म्हणून !

पण महालांच्या सार्वभौम राण्या
आपापले लवाजमे सांभाळत
साद घालतच रहातात -----
थेट ह्रूदया पर्यन्‍त !

आणि मी खेचली जाते
त्या जादूमयी दुनियेचा
अविभाज्य भाग बनून !

मात्र माझ्या कुटीतलं तुळशीचं रोप
त्याहून आर्त साद घालतं -------
कमण्डलूभर पाण्यासाठी.

आणि -----------

नागमोडी वाटांवरून माझी ये - जा
संतत चालूच रहाते .............
पाठी , पुढे ....... पाठी , पुढे.

ह्या धावपळीत
ह्रूदयाचं मात्र काही खरं नाही वाटत आता ----
थांबेल कदाचित आज , उद्या.

तोवर मात्र -------
येरझारा चालूच रहाणार ? ?

प्रभा.
१५.१२.२००७

RELATED POSTS

0 अभिप्राय