मराठी कविता संग्रह

रात्र - निवडक रुबाया - रॉय किणीकर

16:50 सुजित बालवडकर 1 Comments Category :

हा धनाढ्य पंडित कलावंत हा नेता
हा मुनी महात्मा कविश्रेष्ठ हा दाता
मागितले त्यांनी शेवटच्या घटकेला
पीणार कशाने? फ़ुटका त्यांचा पेला

इतिहास घडवला त्यांची झाली कीर्ती
इतिहास तुडविला त्यांची देखिल कीर्ती
गहिवरला अश्रू कीर्ति-स्तंभावरला
पिंडास कावळा अजूनि नाही शिवला

या पाणवठ्यावर आले किति घट गेले
किति डुबडुबले अन बुडले वाहुनि गेले
किति पडुनि राहिले तसेच घाटावरती
किति येतिल अजुनि नाही त्यांना गणती

हा असा राहु दे असाच खाली पदर
हा असा राहु दे असाच ओला अधर
ओठात असु दे ओठ असे जुळलेले
डोळ्यात असु दे स्वप्न निळे भरलेले

राहिले तिथे ते तसेच अपुरे चित्र
राहिले तिथे ते तसेच पुरे पत्र
घटिपात्र बुडाले, कलंडला नि:श्वास
पाखरु उडाले, पडला उलटा फ़ास



आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr




हे लिहीले नाटक, रचिले कोणी गीत
संवाद बसविलेम दिले कुणी संगीत
अर्ध्यावर नाटक टाकुनि नायक गेला
शेवटचा पडदा अजूनि नाही पडला

ते स्वप्न कालचे ठेव तिथे पायाशी
ते स्वप्न उद्याचे ठेव तिथेच उशाशी
हा भरला येथे स्वप्नांचा बाजार
घे हवे तुला ते, मिळते स्वप्न उधार

या इथून गेले यात्रिक अपरंपार
पाठीवर ओझे-छोटासा संसार
किती शिणले दमले म्हणता माझे माझे
वाकले मोडले, गेले टाकुनि ओझे

विरघळून गेले अनंत काळोखात
वितळले संपले धगधगत्या राखेत
चाकात मोडली चढणावरची गाडी
गंगेत वाहते अजुनि चिमुकली काडी

पाऊले उमटली आभाळावर येथे
संपले असे जे संपायचे होते
कुणि लिहील उद्या जे लिहीले नाही कोणी
जे लिहील ती होतील उद्यांची गाणी


हे कुठचे गाणे, असले कसले शब्द
गाऊन बघा ते, होईल जग नि:शब्द
अक्षरे निरक्षर फ़सली जरि शब्दात
जे अनिर्वाच्य ते अवतरते कंठात

पण लिहावयाचे लिहून झाले नाही
पण सांगायाचे सांगुनि झाले नाही
संपली कथा जी कुणी ऐकली नाही
संपली रात्र, वेदना संपली नाही


-रॉय किणीकर



आभार - श्रद्धा भोवड

RELATED POSTS

1 अभिप्राय

  1. Hemalata Thite05/07/2012, 22:32

    Pharach sundar rubaya. Thanks Sujit.

    ReplyDelete