मोजकी उन्हे , मोजक्या सरी
मोजकी उन्हे , मोजक्या सरी , मोजकेच वारे होते
शेवटी किती मोजले तरी मोजकेच सारे होते
पाहिले तिने , गूढ हासली , मान डोलली थोडीशी
हे जुनेच होते नकार की हे नवे इशारे होते
कालही तुझ्या बरसण्यामधे आलबेल नव्हते सारे
कालही तुझ्या पावसातले दोन थेंब खारे होते
मस्तकी टिळा लावला कुणी , हात जोडले काहींनी
छान वागले भक्तगण तुझे .. छान हातवारे होते
पण तुझ्या नभी नेहमी सखे पौर्णिमाच नांदत होती
मी खिशामधे ठेवले तसे दोन चार तारे होते
घट्ट बंद कर ओठ आपले , लाव शांततेची पट्टी
ह्या जगी कुणी शब्द काढला की अरेस का रे होते
वारला म्हणे गुदमरून तो श्वास रोखलेला पक्षी
आठवांवरी, आसवांवरी रात्रभर पहारे होते
- वैभव जोशी
आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
1 अभिप्राय
अप्रतिम खूपच सुंदर ~ पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी !
ReplyDelete