राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!
स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफङाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!
- ग्रेस
2 अभिप्राय
je bbaaat!!!
ReplyDeletewah wah!
ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित "साजणवेळा" या कार्यक्रमाचे रुपांतर मी बोलक्या पुस्तकात (audiobook) केले आहे. "पूर्वार्ध" आणि "उत्तरार्ध" अशा दोन भागात हे बोलके पुस्तक अॅपल आयफोन तसेच आयपॅड स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.
ReplyDeleteजरुर पहा...
https://itunes.apple.com/in/app/sajanvela-part-1/id586514412?mt=8
https://itunes.apple.com/in/app/sajanvela-part-2/id586568619?mt=8