घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे आता राहिलीच आहेत कोठे
घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात
अशी घरे आता राहिलीच आहेत कोठे ..??
आमच्या लहानपणची घरे जशी होती तशीच होती
कितीक काळ कुणास ठाऊक.?
माडीवरचे बळद कितीतरी जुने असावे
पुसलेच जात नाही मनातून
सिगारेट ओढणारा फेल्ट ह्यात घालणारा
पत्री डब्यावरचा अनेक मुखवट्याचा तो डबा
त्यात साठवलेल्या कितीतरी चीनी मातीच्या बाहुल्या
लोलक,भवरे आणखीन काय नि काय
कितीक काळ तसाच होता
पुसलाच जात नाही मनातून ....!!
डबल ब्यारलची सायकल होती हर्क्युलसची
मस्त दणकट मजबूत ...!!
आजोबांच्या काळातली
मामा वापरून त्याची मुले वापरू लागलेली
तशीच होती कितीक काळ कुणास ठाऊक...?
किती काळ पुरली किती वर्ष चालली
ही मस्त मजबूत सायकल हर्क्युलसची
पुसलीच जात नाही मनातून ...!!
आत्ता सायकल गेली स्कूटर आली
आणि गेली ....
बाईक आली
परवाच कोणीतरी कार घ्या म्हणाले
हे सगळे आता भंगार झाले
काळ बदलला वेळ बदलली
स्कूटर विकली
बाईक कधी घेतली आठवत सुद्धा नाही ....!!
माझ्याच घरासमोर छान पटांगण होते
कधीतरी गायब झाले
छोटी-छोटी घरे झाली .
पटांगण गायब झाले
पटांगणाची छोटीशी गल्ली झाली
कधी झाली नि अंगण विस्कटून कसे गेले कुणास ठाऊक ..?
आता घरे बदलली माणसे बदलली
घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात
अशी घरे आता राहिलीच आहेत कोठे ...!!!
माझ्याच घरात सारखी तोडफोड चालू असते
घराचा नकाशा सारखा बदलत असतो दोन-तीन वर्षात
वस्तूच्या जागा बदलत असतात सारख्या सतत
कधीतरी येणारा हसून म्हणतो
सर ..!! ओळखलेच नाही तुमचे घर
इतका छान चेंज केलात...!!
घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे
आता राहिलीच आहेत कोठे ..??
- अनामिक
1 अभिप्राय
really
ReplyDelete