योग नाही!
सांजवेळी सोबतीला ती असावी, योग नाही!
सोबतीचे सोड, साधी भेट व्हावी, योग नाही!
मोर स्वप्नांचे तिच्या मी लाख डोळ्यांनी टिपावे,
धुंद ती व्हावी, भुलावी, मोहरावी, योग नाही!
ती मला देऊन गेली श्रावणाची चिंब गाणी,
मी तिची गीते ऋतूंना ऐकवावी, योग नाही!
ती व्यथेच्या चक्रव्यूहातून वाटा शोधताना,
मी दिशा माझ्या घराची दाखवावी, योग नाही!
मीहि संध्येचा प्रवासी, तीहि होती सांजवेडी
संगतीने वाट दोघांची सरावी, योग नाही!
एकट्याने पेलणे ही वादळे आता स्मृतींची,
लाट यावी, ती फुटावी, ओसरावी, योग नाही!
- क्रान्ति
0 अभिप्राय