खुलासा
खिडकीतुनी दिसावा मुखडा तुझा जरासा
तसबीर देत नाही आता मला दिलासा
स्वप्नातले शहारे सत्यात साहतो मी
मरतो क्षणाक्षणाला जगतो पुन्हा नवासा
गेले अताच येथे बरसून शब्द माझे
लावून अर्थ त्यांचा गेला तुझा उसासा
दे आग अंतरीची, दुरुनी नकोच जाळू
वणवा सुद्धा जीवाला वाटे हवाहवासा
जिंकूनही तुला मी, हरलो कसा कळेना
देऊन हाय गेला, भलतेच दान फासा
डोळ्यातुनी करावे निःशब्द प्रश्न मी अन्
तुही करुन जावे मौनातला खुलासा
– अभिजीत दाते
1 अभिप्राय
[...] This post was mentioned on Twitter by marathikavitasangrah, sujit balwadkar. sujit balwadkar said: खुलासा http://goo.gl/fb/Sirbb [...]
ReplyDelete