मराठी कविता संग्रह

हळवेपण..!

00:13 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

क्षणाक्षणांनी अता मला हे छळू लागले हळवेपण
गळा दाटला आवंढा अन गिळू लागले हळवेपण

कानी आला नाद अनामिक रूणझुण पैंजण चालीचा,
फुल्या मारल्या वाटांवरती वळू लागले हळवेपण.

गूज मनीचे सांगायाला शब्द आसवे नको मला.
नुसत्या नजरेमधून देखिल कळू लागले हळवेपण.

काळाच्या जात्यावरती मी फक्त तुला आठवताना,
अभंग ओव्यांसोबत माझे जुळू लागले हळवेपण.

आनंदाला अन दुःखाला सुगंध कुठुनी आला हा,
जोडत नाते अश्रूंशी दरवळू लागले हळवेपण.

निगरगट्ट होऊन कितीदा घड्या घातल्या जगण्याला.
सवयीने पण पुन्हा पुन्हा चुरगळू लागले हळवेपण..!

– अभिजीत दाते

RELATED POSTS

0 अभिप्राय