मराठी कविता संग्रह

तू कुठे आहेस गा़लिब?

02:30 सुजित बालवडकर 1 Comments Category :

गा़लिब!

मला काहीतरी झालंय...

समुद्र पाहून
काहीतरी व्हायचं माझ्या छातीत...
शहरातल्या गर्दीत उगाच फिरतानाही
दिशाहीन वाटायचं मला...
संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळं मनाचं...
पण आता
साधे तरंगही उठत नाहीत त्यावर.
ऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड...
आता
झाडावरल्या पक्ष्यांनाही कळत नाही झाडाचं हलणं...
रात्री-बेरात्री ऊर उगाच भरून यायचा...
आता
नीरव शांतता पांघरून
डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात,
अंधार पुसत राहतात.
इकडून तिकडे
तिकडून इकडे.
एवढंच काय गा़लिब!
कविता लिहून झाल्यावर
साधा कागद जरी पाहिला
की चक्क दिसायचं रे झुळझुळताना पाणी...
आता कोरड्या पात्रातून चालत पोहोचतो मी
समोरच्यापर्यंत

एकमेकांची तहान पाहात कसं जगायचं असतं
हे एकदा तरी सांग गालिब!
आता मला तुझ्या वेदनांवर
माझ्या जखमांची मेणबत्ती पेटवू दे...
माझं बोट धरून
घेऊन चल मला कवितेच्या जंगलात पडणारा पाऊस पाहायला...
तुझ्या गझलांची हरणं
माझ्या डोळ्यांतून मनापर्यंत
उधाण खेळायला सोड...
मधली कोरडी जमीन
शिंगांनी उकरून काढायला सांग त्यांना मात्र...
गालिब!
मला दुःखाइतकं मोठं व्हायचंय...
भोवतालच्या अंधाराला वणवा नाही लागला तरी चालेल
माझ्या शब्दांचे दिवे तरंगताहेत त्यावर
एवढंच मला पहायचंय...
माझ्या जिवावर पडत चाललेल्या
आत्महत्यांच्या गाठी पार करत-करत
मला मरेपर्यंत जगायचंय...
तुझ्यासारखंच...!
मी तुला कधीचा शोधतो आहे
तू कुठे आहेस गालिब?

नव्या शरीरातून
तू कदाचित ऐकतही असशील तुझंच गाणं...
तुझ्याच दुःखाची
तुला कदाचित ओळख नसेल राहिली...

"खुदा ऐसे एहसास का नाम है
रहे सामने और दिखाई ना दे"
तसा
तू मला भेटतही असशील रोज...
कदाचित
मी बारमध्ये दारू पिताना
माझ्यासमोर झिंगून बसलेला
तूच असशील कदाचित...
कदाचित तू स्वतःच
दारू होऊन रोज पोटात जात असशील माझ्या...

गालिब!
कुणीतरी तुझा शेर ऐकवला
आणि माझ्या तोंडून ''''''''''''''''''''''''''''''''व्वा'''''''''''''''''''''''''''''''' निघलीच नाही...
मी इतका कोरडा होण्याआधी भेट...
अन् भेटल्यावर
नेहमीप्रमाणे माझ्याकडे उधार माग...
मी तुला काहीच देऊ शकणार नाही
म्हणजे मी किती कोरडा झालोय
याची तुला कल्पना येईल...
आता
तू माझा आधार व्हायचंस
मी तुझा नाही...
आणखी कितीतरी शतकं पुरेल
एवढा झंझावात तू ठेवून गेलायस या जगात...
त्यातली फक्त एक झुळूक पुरेल मला
हे संपूर्ण आयुष्य जगायला...
मी तुला कधीचा शोधतो आहे
तू कुठे आहेस गालिब?

- सौमित्र

RELATED POSTS

1 अभिप्राय