मराठी कविता संग्रह

उशीरा उशीरा

02:34 Sujit Balwadkar 0 Comments Category : ,

कधी बोललो मी उशीरा उशीरा, कधी दान पडले उशीरा उशीरा
आयुष्य अवघे चुकामुक आहे, मला हे समजले उशीरा उशीरा

मला मागते ती दटावून आता, तिचे चित्र माझ्या खिशाआतले ते
तिने पहिले हे तिचे श्रेय नाही, जरा मी लपवले उशीरा उशीरा !!

जिवा गुंतवू पाहिले मी अवेळी, नको त्या स्थळी अन नको त्या प्रसंगी
तिला सर्व वेळीच लक्षात आले, मला फार कळले उशीरा उशीरा

अता प्राक्तनाचा उजाडेल तारा, किती जागुनी वाट मी पाहताहे
कधी ना कळे नीज लागून गेली, सितारे झळकले उशीरा उशीरा

किती पाहिली स्वप्न मी बेईमानी, अता खेदखंती कराव्या कशाला?
मला सत्य आधीच ठाऊक होते, पुरावे गवसले उशीरा उशीरा !

गड्या, जिंदगी हाय जमलीच नाही, तिला मी-मला ती उमगलीच नाही
जिण्याचा कधी पीळ गेलाच नाही जरी दोर जळले उशीरा उशीरा !!

- नेणिवेची अक्षरे, संदीप खरे

RELATED POSTS

0 अभिप्राय