मराठी कविता संग्रह

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने

19:35 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने
मला एकटेसे आता वाटताहे
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे

असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे
परंतू मला वेळ बांधुन नेते
कधी मुक्तता हे कुणाला ना ठावे

नको वाटते वाट ह्या पावलांना
नको हालचाली... तनाच्या... मनाच्या
नकोसे शुभारंभ ध्येया - भियाचे
नकोशाच गप्पा आता सांगतेच्या...

असे वाटते की कधी कोणी नव्हतो
न आहे, न वाहे उरातुन श्वास
उरा - अंतरातुन यांत्रिकतेने
फिरे फक्त वारा... किंवा तो ही भास!!!

न ठावे किती वेळ चालेल खेळ
न ठावे किती चावी या माकडाची
जशी ओढती माळ तैशीच मोजू
भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची

सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो
न देई कुणा घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देउन येतो

दिसे जे कवीला न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे
मला तू न दिसशी परंतू तयांच्या
नशिबी कसे सांग तुजला पहाणे

असे वाटणे ही अशी सांज त्यात
दुरावा स्वत:शी तुझ्याशी दुरावा
किती फाटतो जीव सग्ळ्यात ह्यात
मिठीतुन देईन सगळा पुरावा

RELATED POSTS

0 अभिप्राय