मराठी कविता संग्रह

बया

01:37 सुजित बालवडकर 0 Comments Category :

दूर डोंगरांची घळ
तिथे आहे शिवालय ;
अशा भासाने गोंदते
बया बदकांचे पाय ...

देवबाभलीचा काटा
त्याला हळदीचा डंख ;
पायी स्वस्तिक कोरता
हाती बदकांचे पंख !

डबक्यातून बदके
येती चालत गावाला ;
तशी स्वस्तिकांची माळ
झोंबे शिवाच्या पायाला ...

बया ! काय म्हणायचे ?
नाव तिचे ना विरक्ती ?
सत्य मांडताना बाई
थोडी लागते आसक्ती !

तरी सुगाव्याचे भूत
बसे तिच्या मानगुटी ;
शिवालयातील घंटा !
नाद तिच्याही ललाटी ...

RELATED POSTS

0 अभिप्राय