मराठी कविता संग्रह

रिस्क

02:53 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही-
मी संध्याकाळी घरी येतो, तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फ़मधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो,
मी चोरपावलांनी घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजी महाराज फ़ोटोतून बघत असतात,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही... ॥१॥

वापरात नसलेल्या मोरीतल्या फ़ळीवरून मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग मारून आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फ़ळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
...शिवाजी महाराज मंद हसत असतात,
मी स्वयंपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही... ॥२॥

मी : जाधवांच्या मुलीचं लग्नाचं जमलं का गं?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!

...मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळुच काढतो.
वापरात नसलेल्या फ़ळीच्या मोरीवरून ग्लास काढतो,
पटकन पेगचा आस्वाद घेतो,
बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लास कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही... ॥३॥

मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून लग्नाचं वय झालं नाही..
ती : नाही काय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीय म्हणे!
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा..

मी पुन्हा काळ्या कपाटातून कणिक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते..
फ़ळीवरून बाटली काढून पट्कन मोरीत एक पेग मारतो,
शिवाजी महाराज मोठ्ठ्याने हसतात,
फ़ळी कणकेवर ठेवून शिवाजींचा फ़ोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको गॆसवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही... ॥४॥

Anonymous - Jan 18, 2008
मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन तुझी..!
ती : उगाच कटकट करू नका.. बाहेर जाऊन पडा गप्प..

मी कणकेमधून बाटली काढतो,
काळ्या कपाटात जाऊन एक पेग मारतो,
मोरी धुवून फ़ळीवर ठेवतो.
बायको माझ्याकडे बघत हसत असते, शिवाजी महाराजांचा स्वयंपाक चालूच असतो,
पण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही... ॥५॥

मी : (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलंय म्हणे..!
ती : (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!

मी परत स्वयंपाकात जातो, हळुच फ़ळीवर जाऊन बसतो.
गॆसही फ़ळीवरच होता...
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकावून बघतो.. बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते.
...या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही...
अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत.
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत..
मी फ़ोटोतून बायकोकडे बघत असतो..

कारण मी कधीच रिस्क घेत नाही... ॥६॥

RELATED POSTS

0 अभिप्राय