दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अश्रू का इतके पितो, खवळतो, खारावतो सारखा?
केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा
नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी मनासारखा
कोणी निर्दय एवढा न जपतो, जोजावतो सारखा
रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली
दर्पाने कसल्या प्रकाश परका घोंघावतो सारखा?
आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा
भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा
"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा
1 अभिप्राय
Best blog I like it
ReplyDelete