मी अश्रूंच्या डोहामध्ये बुडलो नाही
मी अश्रूंच्या डोहामध्ये बुडलो नाही
तसा वेदनेला ही मी आवडलो नाही
अता किनारे आणि बंधने कशास मजला
पापण्यांत जर कधी कुणाच्या अडलो नाही
मान्य मला मी इथे यायला नकोच होते
उजाड स्वप्ने बघून ही गडबडलो नाही
मी सूर्याचे वार झेलले छाती वरती
कधी सावलीआड स्वतःच्या दडलो नाही
दूर तुला जाताना येथे पहात होतो
निघून गेले प्राण तरी तडफडलो नाही
फूल कसे हे फुलण्या आधी सुकून गेले
कलेवरावर कधी मनाच्या रडलो नाही
काल भेटली तेव्हा ती पूर्वीगत हसली
मी ही अन रडताना मग अवघडलो नाही
शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या
हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही
- सुरेश भट
0 अभिप्राय