मराठी कविता संग्रह

भेट तुझी माझी स्मरते...

18:52 Sujit Balwadkar 0 Comments Category : ,

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची...

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची...

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची...

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची...

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची....

- मंगेश पाडगांवकर

RELATED POSTS

0 अभिप्राय