मराठी कविता संग्रह

अफाट आकाश

02:32 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

अफाट आकाश
हिरवी धरती
पुनवेची रात
सागर-भरती
पाचूंची लकेर
कुरणाच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ
जलवंती-पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

मेघांच्या उत्सवीं
जाहलों उन्मन
दवांत तीर्थांचे
घेतलें दर्शन
दूर क्षितिजाची
निळी भुलावण
पाशांविण मला
ठेवी खिळवून
अक्षयवीणाच घुमे
माझ्या गात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

हलके कढून
कंटक पायींचे
स्वरांत विणिले
सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा
केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें
पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें
अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.

- मंगेश पाडगांवकर

RELATED POSTS

0 अभिप्राय