मराठी कविता संग्रह

नास्तिक

22:10 सुजित बालवडकर 1 Comments Category :




माणसांचे संघटित क्रौर्य पाहून
त्याच्या डोळ्यांत पाणी आले;
त्यांच्या उथळ ज्ञानाने तो व्यथित झाला
आणि त्यांच्या मूर्ख श्रद्धांनी त्याला
खराखुरा दैवी मनस्ताप दिला...


मग, त्याने हृदयातील सारी कणवच
हृदयासह फुंकून टाकली एका
सतत जागणार्‍या मेंदूच्या मोबदल्यात; आणि
हातातील बुद्धिवादाचा दंडुका परजीत तो
आव्हान देत सुटला धर्मग्रंथातील
निर्दय ईश्वरी सत्तेला...



बंधुभाव शिकवणार्‍यांनीच
माणसामाणसांत उभारलेल्या भितींवर त्याने
मनसोक्त प्रहार केले आणि
आमचे ज्ञानचक्षू कायमचे मिटावेत म्हणून राबणार्‍या
शिक्षणव्यवस्थेवर तो दांडूका हाणत राहिला...


आत्मघातकी वेगाने जन्मणारी
गरीब देशांतील मुले पाहताना अचानक
सर्व मानवजातच एखाद्या अणुयुद्धात
संपवून टाकण्याची शक्यता त्याला दिसली
आणि एका कल्पित सुखाचे हासू त्याच्या गालांचे
स्नायू प्रसरण पाववून गेले.


मानवाचा निर्वंश तसा वाईट नाही हे
त्याने दंडुक्याशिवायही पटवून दिले असते;
प्रश्न परंतु पृथ्वीवरच्या
इतर समजूतदार, सुंदर प्राण्यांचाही होता -
खारी, मोर, ससे, वाघ, हरणे इत्यादी इत्यादी.


त्यांचा विचार करताना त्याची
दंडुक्याची पकड सैल झाली आणि
एका दयाळू अनिवार्यतेने
फक्त माणसांच्याच विनाशाची
नवीन शक्यता तो शोधू लागला....

- " बरेच कही उगवून आलेले" द. भा धामणस्कर


Image courtesy: Amit Rane

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

RELATED POSTS

1 अभिप्राय