ही एक प्रोसेस आहे
रोज सकाळी डोळे उघडल्यावर
सर्वप्रथम "नॉक नॉक" करत
स्माईल देणारा तुझा विचार
हाताच्या फटक्या सरशी बाजूला सारून
पांघरूणातून बाहेर निघणं
ही एक प्रोसेस आहे
रिकाम्या घरातल्या भकास बाथरूमात
थंड पाण्याच्या शॉवरखाली उभ्याने
केसांखालच्या मेंदूतून तुझा ओला चेहरा
कोरड्या टॉवेलने खसखस पुसून
टॉवेल झटकत वाळत टाकणं
ही एक प्रोसेस आहे
युनिफ़ॉर्म चढवून, बाह्या मागे वळवून
रोजची ती एक वही उचलत
कालछ रात्री तुझं एक चित्र काढलं होतं नकळत
ते मागचं पान फाडणं.... चुरगाळणं....
आणि फेकून ताठ मानेनं कॉलेजात जाणं
ही एक प्रोसेस आहे
कॅन्टीनच्या घोळात दोस्तांच्या सोबत
कटींगचा घोट घेत घेत.. घेत घेत..
कॅन्टीनचा खास "आपला" कोपरा आहे
पळत तिथून सुसाट निघावं वाटतं
तरीही.... मुद्दाम... तिथेच एकटं जाऊन बसणं
ही एक प्रोसेस आहे
रोजची "इव्हिनींग" घ्यायला कोपऱ्यावर जायचं
तर सुसाट वेगानं गाडी घेताना
सुसाट उडणाऱ्या तुझ्या केसांची आठवण
"इव्हिनींग"च्या धुरात धुरकट करणं
आणि मग फुंकर मारून उडवून लावणं
ही एक प्रोसेस आहे
अंधारात अंधारकाळ्या डोळ्यांच्या फॅन्टसी
स्पर्शास्पर्शातून झिरपणारी एक्स्टसी
प्रेमाच्या काही मूमेंट्सचं मॉन्यूमेंटल मॅजिक....
आणि परत अंथरुणावर "सिस्टीम कन्सीडरींग लॉजिक"!!
लॉजिकली या सगळ्यांना काढून फेकणं
ही एक प्रोसेस आहे.
सालं सगळं आयुष्य फ्लोचार्ट बनलंय
भावना साल्या "डिसिजन बॉक्स" मधे अडकल्यात
पण जरा समजून घे गं बाई..
ही एक प्रोसेस आहे
प्रोसेस चालू आहे
प्रोसेस माझी चालूच आहे.
संहिता हिस्वनकर
2 अभिप्राय
Thank You Sir. For considering my work worthy of your publishings.
ReplyDeleteSamhita
my pleasure
ReplyDelete