धैर्य
जसं की...कांदा
कांद्याच्या आत वाटी...
वाटीच्या आत वाटी...
वाटीत वाटी...वाटीत वाटी...
कांदाणू...
परमकांदाणू...
आणखी आत...आत आsत...
अगदी आssत?...
माहित नाही......
जसं की...कांदा
त्याच्यावर हवा...
त्याच्याभोवती हवा...
हवेभोवती हवा...
तिचे थरांवर थर...
मग...निर्वात...
अंधार...
अंतराळ...
अंतराळं...
बाहेर...
अगदी बाsहेर...
अगदी बाssहेरचं?
माहित नाही......
...ती पडल्या पडल्या डोळाभर बघते मला
आणि मग डोळे मिटून हातांनी ’चाचपत’ राहते,
सध्या तिच्या असलेल्या हातांनी’
सध्या माझा असलेला चेहरा......
ही कविता खरं तर भीत भीत...
कापऱ्या कापऱ्या हातांनी
तिलाच लिहायची होती एकदा...
तिचं धैर्य होत नाही...माझं होतं...एवढंच !
- संदीप खरे
0 अभिप्राय