किती स्थित्यंतरे करशील साध्या राहणी मध्ये?
जगाला भावली असतील का? या काळजीमध्ये
किती स्थित्यंतरे करशील साध्या राहणीमध्ये?
जरी प्रत्येक बी ला हक्क असला झाड होण्याचा
कशी रुजणार ती, जी पेरली नापिक भुईमध्ये?
निकालालाच आहे भाव हे माहीत असताना
उगाचच गुंततो का मी परीक्षा पद्धतीमध्ये?
घरी एकाच असतो राहण्या आम्ही तिघे भाऊ
तरीही वाटणी होतेच धान्याची सुगीमध्ये
तुझे सांगून झाले की मला सांगायचे आहे
मलाही दु:ख आहे ह्या विलासी जिंदगीमध्ये
कितीही होउ द्या हल्ले, कुणीही डगमगत नाही
कुठुन येतो असा 'कणखर' पणा ह्या मुंबईमध्ये?
-----------
विजय दिनकर पाटील 'कणखर'
0 अभिप्राय