याल्गार
नशीबास ’कर हवे तेवढे वार’ म्हणालो
’मानणार ना तरी कधी मी हार’ म्हणालो
केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला
’खुशाल यावे उघडे आहे दार’ म्हणालो
खेळवून मज अखेर जेव्हा नियती दमली
डाव नवा मांडून तिला ’तैयार’ म्हणालो
रिचवून सारे तुडंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही ’आभार’ म्हणालो
कुबेर आला दारी म्हणाला माग हवे ते...
हसून त्याला ’केवळ खांदे चार’ म्हणालो
रडलो नाही... लढलो, भिडलो आयुष्याला
राखेतुनही उठलो अन् ’याल्गार’ म्हणालो
-गुरु ठाकूर
(नशिबास हसत हसत टक्कर देणारे असंख्य चेहरे आपल्या आजुबाजूला दिसत असतात. त्या सर्व योद्ध्यांना माझा सलाम. कारण त्यांना पाहिलं की आपली दु:ख टिचभर होऊन जातात.)
(याल्गार: तलवार उपसून नव्या दमाने शत्रूवर तुटून पडताना जी आरोळी ठोकतात)
1 अभिप्राय
लय भारी
ReplyDelete