कहाणी – 2
‘जो तो पळून जातो, ऐकुन ही कहाणी’ या मिसर्यावर तरही गझल लिहिण्याचा हा दुसरा प्रयत्न -
जो तो पळून जातो, ऐकुन ही कहाणी
सांगायची कितीदा रंगून ही कहाणी
खोटी सहानुभूती देतोस रे कशाला
तू एकदा पहा ना भोगून ही कहाणी
नाही मला कुणीही माझ्याशिवाय वाली
जाऊ तरी कुठे मी सोडून ही कहाणी
वाटे जिण्यात माझ्याकाही नशा असावी
जाते पुन्हा पुन्हा का झिंगून ही कहाणी
पेलायची न आता माझ्याविना कुणाला
माझ्यासवेच जावी संपून ही कहाणी
– अभिजीत दाते
(तिसरा प्रयत्न पुढच्या पोस्ट मध्ये)
1 अभिप्राय
[...] दुसरा प्रयत्न पुढच्या पोस्ट मध्ये [...]
ReplyDelete