मराठी कविता संग्रह

देखावे बघण्याचे वय निघून गेले

00:00 सुजित बालवडकर 0 Comments Category :

देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले

गेले ते उडुन रंग
उरले हे फिकट संग
हात पुढे करण्याचे वय निघून गेले

कळते पाहून हेच
हे नुसते चेहरेच
चेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले

रोज नवे एक नाव
रोज नवे एक गाव
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले

रिमझिमतो रातंदिन
स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले

हृदयाचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघून गेले

एकटाच मज बघून
चांदरात ये अजून
चांदरात फिरण्याचे वय निघून गेले

आला जर जवळ अंत
का हा आला वसंत
हाय्‌, फुले टिपण्याचे वय निघून गेले

गीत - सुरेश भट
संगीत - माधव भागवत
स्वर - माधव भागवत

RELATED POSTS

0 अभिप्राय