मराठी कविता संग्रह

व्यथा

17:19 सुजित बालवडकर 1 Comments Category : ,

tear

मी गुन्हे अक्षम्य केले ही खरी आहे व्यथा
त्यांसही तू माफ केले ही खरी आहे व्यथा

वाट मी चुकलो कितीदा, सांगती जे जे मला
काननी त्यांनीच नेले ही खरी आहे व्यथा

जुलुम आहे कोरडे हे वागणे, साकी, तुझे
त्यावरी हे रिक्त पेले ही खरी आहे व्यथा

लोकहो, पुसता कशाला प्रांत माझा कोणता
देश येथे फाटलेले ही खरी आहे व्यथा

जहर टीकेचे जनांच्या रिचवले असतेच मी
वाचल्यावाचून गेले ही खरी आहे व्यथा

- मिलिंद फणसे

RELATED POSTS

1 अभिप्राय